प्रभात वृत्तसेवा पुणे – मीरा- भायंदरचा कुख्यात ड्रग माफिया मोहम्मद अजिम अबू सालेम खान (५०) याच्या कोंढव्यातील पोलीस कारवाईदरम्यान झालेल्या मृत्यू प्रकरणाला नवं आणि धक्कादायक वळण लागले आहे. ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक अहवालात त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर अनेक ठिकाणी जखमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट राहिले आहे.या पार्श्वभूमीवर सीआयडीने ससून रुग्णालयालाच पत्र लिहून मृत्यूचे स्पष्ट कारण सांगण्याची मागणी केली आहे. बी. जे. मेडिकल कॉलेज आणि ससून जनरल हॉस्पिटल येथील फॉरेन्सिक मेडिसिन विभागाने दिलेल्या अहवालानुसार, शारीरिक जखमांबरोबरच मृतदेहाच्या रक्तवाहिन्यांत कोरोनरी आथेरोस्क्लेरोसिस म्हणजे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा आजार असल्याचे आढळले. तरीदेखील हे नैसर्गिक कारण आहे की बाह्य आघातामुळे मृत्यू झाला, याविषयी अहवालात संदिग्धता आहे. सीआयडीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार.. सर्व दस्तऐवज, पोस्टमॉर्टेम अहवाल आणि कारवाईत सहभागी अधिकाऱ्यांची निवेदने घेतली आहेत. आता चौकशीचा केंद्रबिंदू म्हणजे अजिम सालेमचा मृत्यू पोलिसांनी ताब्यात घेताना झटापटीत झाला आहे, की आधीपासून असलेल्या आजारामुळे झाला, याचा शोध सुरू आहे. अशी घडली घटना.. कोंढव्यातील एका सोसायटीमध्ये १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मीरा-भायंदर पोलीस आणि कोंढवा पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. अजिम सालेम कौसर बाग येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये लपला होता. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा सालेमने अचानक प्रतिकार केला आणि एका कॉन्स्टेबलच्या छातीला चावला. या वेळी पोलिसांबरोबर झालेल्या झटापटीत काही क्षणांतच तो कोसळला आणि बेशुद्ध पडला. ससून रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नैसर्गिक मृत्यू की ‘कस्टडी डेथ’? सुरुवातीला कोंढवा पोलिसांनी हा मृत्यू अपघाती म्हणून नोंदवला होता; पण अहवालातील जखमा पाहता प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आले. आता पोलिसांच्या ताब्यातील मृत्यू या स्वरूपातही तपासाची दिशा वळू शकते. ससूनच्या अहवालात व्हिसेरा आणि डीएनए नमुने तपासासाठी जतन करण्यात आले आहेत. त्यामुळे रिजनल फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्यानंतरच या गूढ मृत्यूमागील सत्य उघड होण्याची शक्यता आहे.