Pune Crime | धक्कादायक प्रकार! प्रेमजाळात अडकवून लाखोंची खंडणी ; कंडक्टर तरुणीची फसवणूक उघड

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सोशल मीडियावर ओळख वाढवून मैत्री, त्यातून शारीरिक संबंध ठेवले अन् नंतर बलात्काराची खोटी केस दाखवण्याची धमकी देऊन लाखोंची खंडणी उकळणाऱ्या एका तरुणीविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणीने तब्बल तीन तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी आंबेगाव येथील ३१ वर्षीय तरुणाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ५ नोव्हेंबर २०२३ ते ७ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत घडली. फिर्यादी तरुण हा विवाहित असून, तो एसआरपीएफमध्ये जवान आहे.
तर आरोपी तरुणी पीएमपीएलमध्ये कंडक्टर आहे. तीने फिर्यादीशी गोड बोलत मैत्री प्रस्थापित केली. त्यानंतर त्याला आपल्या घरी बोलावून शारीरिक संबंध ठेवायला प्रवृत्त केले. स्वतःच्या संमतीने संबंध ठेवून झाल्यानंतर मात्र त्याला बलात्काराची खोटी केस दाखवण्याची धमकी देण्यात आली. या धमकीच्या जोरावर तरुणीने फिर्यादीकडून १ लाख ७२ हजार ६६४ रुपयांची खंडणी उकळली. यामध्ये रोख रकमेसह सोन्याचे दागिने आणि इतर वस्तूंचा समावेश होता.त्यानंतर आणखी पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली.
मात्र, फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला असता त्याच्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात ८ फेब्रुवारी २०२५ रोजी बलात्कार आणि ॲट्रॉसिटीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेनंतर पोलिसांनी चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. याच तरुणीने याआधीही नांदेड आणि कंधार येथे अशाच पद्धतीने तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवले होते. तीने २०१७ मध्ये नांदेडमधील एका तरुणाशी तसेच २०२२ मध्ये कंधारमधील एका तरुणाशी शारीरिक संबंध ठेवले.
त्यानंतर त्यांच्याविरुद्धही बलात्कार आणि ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करून खंडणी उकळली.फिर्यादीसह इतर दोन घटनांमध्येही हीच पद्धत वापरल्याने ही तरुणी प्रेमजाळ्याच्या नावाखाली तरुणांना फसवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शरीराचा वापर करून खंडणी उकळण्याचा हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड करीत आहेत.





