Pune Crime : पोलिसांनी उघड केली मोठी गांजा तस्करी ; रात्रीचा पाठलाग करून गांजासह तिघे अटकेत

प्रभात वृत्तसेवा
रांजणगाव गणपती – अंमली पदार्थांच्या अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF) कोल्हापूर कृती विभाग, कार्यसन पुणे व रांजणगाव पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल २५ किलो ६४२ ग्रॅम गांजा जप्त करत तिघांना जेरबंद करण्यात आले. जप्त मुद्देमालाची किंमत लाखोंमध्ये असून आरोपींविरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील शिंदे वस्तीजवळ ही कारवाई झाली.
गस्तीवर असलेल्या पथकाला मारुती इको (एम.एच. १२ आर.एफ. ७११४) ही गाडी वेगाने जाताना संशय आला. वाहन थांबवण्याचा प्रयत्न केल्यावरही चालकाने गाडी न थांबवल्याने पोलिसांनी पाठलाग करून ती शिंदे वस्तीजवळ अडवली. गाडी थांबवून तपासणी केली असता सीटखाली लपवलेल्या पांढऱ्या पोत्यांतून उग्र वास आल्याने तपासणीत गांजा सापडला. पंचांच्या उपस्थितीत मोजणी केली असता, २५ किलो ६४२ ग्रॅम गांजा आढळून आला.
या प्रकरणी पोलिसांनी वसीम अब्दुल सय्यद (वय ३५), मुबशीर उर्फ जिमी मन्सूर खान (वय २७), राहुल रामदास कनगरे (वय २६, सर्व रा. स्टेशन रोड, दत्तनगर, राहुरी अहमदनगर) यांना अटक केली. गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन आरोपी वसीम सय्यद याचे असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.या कारवाईत अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान मचाले, शिवाजी बंद्रे, पोलीस अंमलदार अनिल पास्ते, हेड कॉन्स्टेबल महेश गवळी, प्रशांत बोमदंडी, चेतन चव्हाण,
कॉन्स्टेबल किशोर बर्गे तसेच रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे व वाहन चालक पांडुरंग साबळे आदींचा समावेश होता.युवकांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अंमली पदार्थांच्या अवैध धंद्यांविरोधात जनतेनेही सतर्क राहून त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन यावेळी पोलिसांनी केले.





