Pune Crime : पोलिसांची घायवळच्या घरावर धाड! जिवंत काडतुसे, पुंगळ्या आणि आर्थिक कागदपत्रे जप्त

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई झाल्यानंतर परदेशात पलायन केलेला गुंड नीलेश घायवळच्या घरातून पोलिसांनी दोन जीवंत काडतुसे, तसेच चार पुंगळ्या(वापरलेली काडतूसे) जप्त केल्या. याप्रकरणी कोथरूड ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर यांच्या फिर्यादीनुसार, कोथरूड पोलिसांनी शनिवारी श्री संत ज्ञानेश्वर काॅलनीतील घायवळच्या घरी झडती घेतली असता कपाटातून दोन काडतुसे, चार पुंगळ्या जप्त केल्या.
तसेच काही जमिनीच्या व्यवहाराची कागदपत्रेही ताब्यात घेतली.कोथरूड गोळीबार प्रकरणात मयूर कुंबरे, रोहित आखाडे, गणेश राऊत, मयंक उर्फ मॉन्टी व्यास, आनंद चांदलेकर उर्फ अंड्या, दिनेश फाटक यांना अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर घायवळ बनावट पारपत्राद्वारे स्वित्झर्लंडमध्ये गेल्याचे वृत्त आहे. घायवळला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी लूक आऊट नोटीस बजाविली आहे.घायवळऐवजी गायवळ असे नाव वारून त्याने पारपत्र मिळवले आहे.
दहा बँक खाती गोठवली..
घायवळ, तसेच कुटुंबीयांचे आर्थिक स्रोत पोलिसांनी तपासल्यावर दहा बँक खाती गोठविण्याबाबत पोलिसांनी बँकेशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर बँकेकडून नीलेश घायवळ, शुभांगी घायवळ, स्वाती नीलेश घायवळ, कुसुम घायवळ आणि पृथ्वीराज एंटरप्रायझेस ही बँक खाती गोठविण्यात आली आहे. दहा बँक खात्यांतील ३८ लाख २६ हजार रुपये आढळून आले आहेत. पुणे पोलिसांच्या परवानगीशिवाय या खात्यातून व्यवहार करता येणार नाहीत.





