Pune Crime | बंडू आंदेकरच्या घरावर पोलिसांचा छापा ; घरातून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

प्रभात वृत्तसेवा
पुणे – कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्या घराची पोलिसांनी घेतलेल्या झडतीत कोट्यवधी रुपयांचा ऐवज हाती लागला आहे. पोलिसांनी तब्बल ६७ लाखांचे सोन्याचे दागिने, चांदी, २ लाख ५० हजार रुपयांची रोकड, एक अलिशान मोटार कार, विविध करारनामे आणि कर भरल्याच्या पावत्या, असा मोठा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय आंदेकरने केलेल्या जमीन व्यवहाराच्या काही इसार पावत्याही पोलिसांना मिळाल्या आहेत.
दरम्यान, आयुष उर्फ गोविंद गणेश कोमकर (वय १९, रा. नाना पेठ) या महाविद्यालयीन तरुणाच्या खुनाचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.गृहकलहातून बंडू आंदेकरने स्वतःच्याच नातवाच्या हत्येचा कट रचला होता. ५ सप्टेंबरला गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला रात्री साडेसातच्या सुमारास नाना पेठेत हल्लेखोरांनी आयुष कोमकरवर गोळ्यांचा वर्षाव केला. गंभीर जखमी झालेल्या आयुष्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
खुनानंतर आंदेकर कुटुंबासह प्रवास करून देवदर्शनासाठी निघाला होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे.खुनाच्या तपासादरम्यान १० सप्टेंबरला संध्याकाळी पाच वाजता पोलिसांनी आंदेकरच्या घरावर सर्च ऑपरेशन केले. गुरुवारी (११ सप्टेंबर) पहाटे चार वाजेपर्यंत चाललेल्या या कारवाईत पोलिसांना कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला. या कारवाईनंतर आंदेकरच्या आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
तपास गुन्हे शाखेकडे…
आयुष कोमकर हत्येप्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक झाली आहे. उर्वरित पाच आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या विविध पथकांना कामाला लावण्यात आले आहे. आंदेकर टोळीला मदत करणाऱ्यांची सविस्तर माहिती गोळा करून त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.





