Pune Crime | पोलिसांची क्लिनअप मोहीम ; ९ सराईत गुंड दोन वर्षांसाठी तडीपार

प्रभात वृत्तसेवा
पुणे – लोणी काळभोर, बिबवेवाडी, तसेच हडपसरमधील फुरसुंगी परिसरात गंभीर गुन्हे करणाऱ्या नऊ सराईतांना परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांनी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.प्रेमलता मुकेश करमावत ( ४५, रा. मंतरवाडी, फुरसुंगी), पंकज मुकेश करमावत (२५, रा. उत्तमनगर), मनोज रतन गुमाणे (५०, रा. भीमनगर, मुंढवा), शेख अहमद ऊर्फ बबलू सूरज सय्यद (१९, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), सागर संदीप गुडेकर (२४, रा. इंदिरानगर, कदमवाक वस्ती), जाफर शाजमान इराणी (४३), मजलूम हाजी सय्यद (४८), शब्बीर जावेद जाफरी (३८) आणि शाजमान हाजी इराणी (६२, चौघेही रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.
करमावत, गुमाणे यांच्याविरुद्ध गावठी दारूविक्री, बबलू सय्यदविरद्ध खुनाचा प्रयत्न, गुडेकरविरुद्ध खून, बेकायदा शस्त्र बाळगणे, इराणी टाेळीविरुद्ध फसवणूक, चोरी असे गंभीर गु्न्हे दाखल आहेत. आरोपींना शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव लोणी काळभोर, मुंढवा, कोंढवा पोलिसांनी तयार केला होता. हा प्रस्ताव परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांना पाठविल्यानंतर त्यांनी करमावत, गुमाणे, गुडेकर, इराणी, सय्यद, जाफरी यांना शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, परिमंडळ पाचमधील ११ टोळ्यांमधील ७६ गुंडांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे, तसेच २० गुंडांविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. ४१ सराईतांना तडीपार करण्यात आले असून, एकूण १३७ सराईतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तडीपार गुंड शहरात आढळून आल्यास त्वरीत परिमंडळ पाच पोलीस उपायुक्त कार्यालयास (दूरध्वनी – ०२०- २६८६ १२१४) संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





