Pune Crime : आंदेकर टोळीवर पोलिसांची कारवाई ; १७.९८ कोटींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मोक्का कायद्याअंतर्गत आंदेकर टोळीच्या तब्बल १७ कोटी ९८ लाख रुपयांच्या मालमत्तेची जप्ती प्रक्रिया सुरू आहे. आयुष कोमकर खूनप्रकरणी पोलिसांनी टोळीवर मोठा घाव घातला आहे. टोळीप्रमुख सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकरसह १६ जणांना अटक झाली असून, त्यात तीन महिलांचा समावेश आहे.आयुष कोमकरच्या हत्येनंतर पोलिसांनी व्यापक तपास करून टोळीच्या अनेक सदस्यांना गजाआड केले. तपासादरम्यान आरोपी मुनाफ पठाण, सोनाली वनराज आंदेकर यांचाही सहभाग उघडकीस आला, तसेच घरातील सीसीटीव्ही फुटेज डिलिट करणारा मोहन गाडेकर याला २६ सप्टेंबर रोजी अटक करून न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
कारवाईदरम्यान दोन पिस्तूल, चार चारचाकी, चार दुचाकी, २८ मोबाइल फोन, सोन्या-चांदी चे दागिने व रोकड असा एकूण ९५.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच टोळी सदस्यांच्या ३७ बँक खात्यांतील १.४७ कोटी रुपये गोठविण्यात आले आहेत. टोळीच्या निष्पन्न मालमत्तेत बंडू आंदेकरची फुरसुंगी येथील २४.५ गुंठे जागा, कोथरूड व नाना पेठेतील फ्लॅट्स व दुकाने, वृंदावणी वाडेकरचे तीन मजली घर, शिवम व शिवराज आंदेकर यांची मालमत्ता, तसेच सोनाली आंदेकरच्या नावे असलेली दुकाने यांचा समावेश असून, पोलिसांनी त्याचा तपास हाती घेतला आहे. दरम्यान, आंदेकर टोळीविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात खंडणीप्रकरणी व समर्थ पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणखी गुन्हे दाखल झाले आहेत.





