Pune Crime | ‘ड्राय डे’ असतानाही दारूची खुलेआम विक्री

प्रभात वृत्तसेवा
पुणे – गणेशोत्सवामुळे शहर, जिल्ह्यात बुधवारी (दि. २७) ‘ड्राय डे’ घोषित केला असतानाही मध्यवर्ती भागात खुलेआम दारू विक्री सुरू होती. खडक पोलिसांनी पथकाने शुक्रवार पेठेत छापा टाकून देशी, विदेशी दारूचा साठा जप्त केला. कुख्यात मटका किंगसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
वैभव विजय डोंगरे (२६), गुड्डू कुमार भोलाकुमार कुमार (२६) आणि मटका किंग नंदू नाईक (रा . सर्व. शुक्रवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी रात्री शुक्रवार पेठेतील रोनक बार येथे ही कारवाई केली.मध्यवर्ती भागात गणेशोत्सवात मोठी गर्दी होत असल्याने या ठिकाणी पोलिसांनी वॉच ठेवला होता.
त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप व्हटकर, अंमलदार आशिष चव्हाण, हर्षल दुडूम, किरण ठवरे, नदाफ, फरांदे , गोरे आदींचे पथक गस्तीवर होते. रोनक बारच्यामागील खोलीत अवैधरित्या दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने छापा टाकून वैभव डोंगरे व गुडुकुमारला ताब्यात घेतले.
त्यांच्या ताब्यातून विविध ब्रँडच्या देशी-विदेशी दारूच्या शेकडो बाटल्या, रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा तब्बल १ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीत आरोपींनी सांगितले की, ते हा साठा नंदू नाईकच्या सांगण्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना विकत होते. त्यानंतर पोलिसांनी नाईकसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.





