Pune Crime : रिक्षात बसण्यास मनाई! संतप्त अल्पवयीनांनी केली १२ वाहनांची तोडफोड ; जाणून घ्या संपूर्ण घटना

प्रभात वृत्तसेवा
पुणे – रिक्षात बसण्यास मनाई केल्याने अल्पवयीनांनी भवानी पेठेतील कासेवाडी भागात दहशत माजवून वाहनांची तोडफोड केली. अल्पवयीनांनी दगडफेक करून रिक्षा, टेम्पो, मोटार अशा १२ वाहनांच्या काचा फोडल्या. या प्रकरणी चार अल्पवयीनांना खडक पोलिसांनी ताब्यात घेतले.कासेवाडी भागात वसाहतीत मुले राहायला आहेत. या भागात दाटीवाटीने घरे आहेत. त्यामुळे या परिसरातील मुले रिक्षात गप्पा मारत थांबतात. शुक्रवारी (३ ऑक्टोबर) मुले रात्री रिक्षात गप्पा मारत होती. त्यावेळी एका रिक्षाचालकाने त्यांना रिक्षात बसण्यास मनाई केली.
या कारणावरून अल्पवयीन मुले चिडली अन् त्यांनी मध्यरात्री पिंपळमळा परिसरातील रिक्षा, टेम्पो, मोटारीच्या गजाने आणि दगडफेक करून काचा फोडल्या. या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट उडाली. रहिवाशांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. खडक पोलिसांनी चार अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली. मागील काही दिवसांत शहरात वाहन तोडफोडीच्या घटना वाढल्या आहेत. नाना पेठेतील मंजुळाबाई चाळ, धनकवडी, बिबवेवाडी, औंध भागांत वाहनांची तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या.





