पुणे : खडक पोलीस ठाण्याच्या पथकाने लक्ष्मी माता मंदिराजवळ काशीवाडी परिसरात मोठी कारवाई करत गावठी हातभट्टीची दारू बनवणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात दारू व रसायनसाठा जप्त केला आहे. कारवाईत राधा अनिल सोनवणे ( ५० ) या महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याकडून सुमारे २४,००० रोख व दारूचे साठे जप्त करण्यात आले आहेत. पोलीस शिपाई आशिष चव्हाण यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक २५ जून २०२५ रोजी सकाळी मिळालेल्या खबरीनुसार सदर परिसरात आरोग्यास घातक रसायने मिसळून गावठी हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याचे समजले. यासंदर्भात सहायक पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव व पोलीस उपनिरीक्षक कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक स्थापन करून छापा टाकण्यात आला. तपासादरम्यान आरोपीने आणखी एक रूम दाखविली, जिथे विक्रीसाठी ग्राहकांची उपस्थिती होती. सदर रूम्स संतोष शिंदे व आशा तलवारे यांच्या मालकीच्या असून त्यांनी त्या भाड्याने दिल्याचे उघड झाले आहे. संपूर्ण कारवाई पंचासमक्ष पार पाडण्यात आली असून गावठी दारूचे उर्वरित साठे व साहित्य जागेवरच नष्ट करण्यात आले. रासायनिक विश्लेषणासाठी एक नमुना सीलबंद करून प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १२३, २७४, २७५ व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत कलम ६५(ई), ब्र. ६८, ८६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.