Pune Crime : खडक पोलीसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगार अथर्व सणस पिस्तुल आणि २२ जिवंत काडतुसांसह जेरबंद

पुणे – खडक पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रतिबंधक पथकाने धाडसी कारवाई करून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अथर्व ऊर्फ आप्पा उमाकांत सणस ( २३, रा. गुरुवार पेठ, पुणे) याला दोन गावठी पिस्तुल व २२ जिवंत काडतुसांसह जेरबंद केले आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख २ हजार रुपये इतकी आहे. ही कारवाई गुरुवार पेठेतील शितळा देवी चौक परिसरात करण्यात आली.
आरोपी अथर्व ऊर्फ आप्पा सणस हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. मात्र त्याच्यावर पूर्वीपासून गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
पोलिसांनी सांगितले की, खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान पोलीस हवालदार हर्षल दुडम यांना खबर मिळाली की, सराईत गुन्हेगार अथर्व सणस हा पिस्तुलासह शितळा देवी चौक येथे थांबला आहे. ही माहिती पोलीस उप-निरीक्षक महेंद्र कांबळे यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) श् शर्मिला सुतार व मनोजकुमार लोंढे यांना दिली.
वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतर तपास पथकाने शितळा देवी चौक येथे सापळा रचला. त्यावेळी अथर्व सणस पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पथकाने शिताफीने पाठलाग करून त्याला पकडले. अंगझडतीदरम्यान त्याच्या कंबरेतून एक गावठी पिस्तुल, मॅगझीन व २२ जिवंत काडतुसे मिळून आली. त्याने कबुली दिल्यानंतर आणखी एक गावठी पिस्तुल जवळील वाड्यात विटांच्या ठिगाऱ्याखाली लपवलेले मिळाले. त्याच्या विरुध्द खडक पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टनूसार गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम) राजेश बनसोडे, उप-आयुक्त (परिमंडळ १) कृषीकेश रावले, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त अनघा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, मनोजकुमार लोंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेंद्र कांबळे यांच्यासह अंमलदार हर्षल दुडम, अजित फरांदे, किरण ठवरे, निलेश दिवटे, योगेश चंदेल, शोएब शेख, मयूर काळे, विकास पांडोळे, कृष्णा गायकवाड, शुभम केदारी, अक्षयकुमार वाबळे, विश्वजित गोरे या पथकाने केली.





