Pune Crime | नीलेश घायवळ टोळी पुन्हा सक्रिय? कोथरूडमध्ये पंधरा मिनिटांत दोन हल्ले ; गोळीबार आणि कोयत्याचा कहर

प्रभात वृत्तसेवा
पुणे – नाना पेठेत टोळीयुद्धातून आयुष कोमकर याच्यावर गोळ्या झाडून खून केल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री कोथरूड भागात एका तरुणावर गाेळीबार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर कोथरूड परिसरात घबराट उडाली. गोळीबारात एक तरुण जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालायात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याच टोळीने अवघ्या पंधरा मिनिटांत आणखी एका ठिकाणी तरुणावर कोयत्याने वार करत दहशत पसरवली. प्राथमिक तपासात हे सर्व गुन्हेगार कोथरूडमधील गुंड नीलेश घायवळ टोळीतील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
प्रकाश धुमाळ (डांगे चौक) असे गोळीबारात गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मयूर ठोंबरे, गणेश राऊत, मयंक व्यास, रोहित आखाडे, अनंत जाभळेकर, विनय पाठक व इतरांविरुद्ध कोथरूड पोलिसांत दोन वेगवेगळ्या खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे आरोपी काेथरूडमधील नीलेश घायवळ टोळीशी संबंधित आहेत. कोथरूड परिसरात बुधवारी रात्री शेख, राऊत, आखाडे, कुंभारे यांनी धुमाळ याच्यावर पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या.
गाेळीबारात धुमाळ गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या धुमाळ याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. धुमाळ याच्या मानेला गोळी चाटून गेली असून, दोन गोळ्या मांडीत शिरल्याची माहिती पोलिसांनी दिली. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
कोथरूड पुन्हा दहशतीखाली..
कोथरूड भागात गजानन ऊर्फ गज्या मारणे आणि नीलेश घायवळ टोळीची दहशत आहे. या दोन टोळ्यांमध्ये वैमनस्य आहे. कोथरूड भागात शिवजयंतीच्या दिवशी एका संगणक अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी गज्या मारणेसह साथीदारांविरुद्ध पोलिसांनी ‘मोक्का’ कारवाई केली होती. यामध्ये तो टोळीसह कारागृहात आहे. घायवळ याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. घायवळ याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे घायवळने सध्या त्याचे बस्तान नगर जिल्ह्यात बसवले आहे. यामुळे मागील काही महिन्यांपासून कोथरूड भागात शांतता होती.
पंधरा मिनिटांत दोन हल्ले..
प्रकाश धुमाळ ब्लू चीप कंपनीत कामाला आहे. तो बुधवारी दुपारी मित्रांसह खेड शिवापूर परिसरात पार्टी करायला गेले होता. तेथून परत येताना, कारमधून एका मित्राला कोथरूडला सोडले. त्याच्या मागूनच दोन दुचाकीवरून संशयित आरोपी आले. त्यांनी आम्ही येथील भाई आहोत, तुम्ही येथे का थांबला, असे म्हणत त्यांनी प्रकाशवर गोळीबार केला. त्यानंतर दहा मिनिटांतच सागर कॉलनी येथे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या वैभव साठे (रा. सागर कॉलनी) नावाच्या तरुणावर याच आरोपींनी कोयत्याने हल्ला केल्याची दुसरी घटना घडली. दोन्ही घटना दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरांनी घडल्या. जखमींची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. दरम्यान, यामध्ये नीलेश घायवळची भूमिका शोधली जात आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.





