Pune Crime : मोक्कावाला गुंड थेट लंडनला! नीलेश घायवळने पोलिसांना दिला चकवा ; लूक आऊट नोटीस जारी

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शहरातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ पोलिसांना चकवा देत थेट लंडनमध्ये स्थायिक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. घायवळसह दहाजणांवर मोक्का कारवाई केली होती. यानंतर त्याने पळ काढला असून आता त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केली आहे.खंडणी, अपहरण, खून आणि दहशतीतून मिळवलेल्या काळ्या पैशाने घायवळने परदेशात आलिशान घर बांधले असून, आपल्या मुलाला ‘हाय-फाय’ शाळेत दाखल केले आहे. पुण्यातील कोथरूडमध्ये नुकत्याच झालेल्या गोळीबारानंतर पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरोधी कायदा (मोक्का) लावला आहे.
पासपोर्ट कसा मिळाला ?
रेकॉर्डवरील गंभीर गुन्हे असतानाही घायवळला पासपोर्ट कसा मिळाला? हा प्रश्न आता शासन-प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, लुकआऊट नोटीस जारी केली असून तो भारतात परतताच लगेच अटक होणार आहे. पोलिसांच्या माहितीनुसार १७ सप्टेंबर रोजी कोथरूड पोलिस ठाण्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर सराईतांनी गोळीबार करून एका तरुणाला जखमी केले.
त्यानंतर दहा मिनिटांत दुसऱ्या एका तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणात घायवळ टोळीचा थेट सहभाग समोर आला होता. यानंतर घायवळसह दहाजणांवर मोक्का कारवाई केली असून, त्यातील पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. मयुर कुंबरे, मयंक व्यास, गणेश राऊत, दिनेश फाटक, आनंद चांदेलकर यांना बेड्या ठोकल्या आहेत. बाकीचे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
घायवळ सध्या परदेशात आहे. त्याच्यावर लुकआऊट नोटीस बजावली आहे. तो भारतात परतताच त्याला अटक होईल असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.





