Pune Crime | शाळेच्या आवारात गांजाची लागवड? ; महिला सुरक्षा रक्षकावर गंभीर आरोप

प्रभात वृत्तसेवा
पुणे – बोपोडी येथील डॉ. राजेंद्र प्रसाद शाळेत कार्यरत असलेल्या महिला सुरक्षा रक्षकावर गांजाची लागवड, कामावर गैरहजेरी, दारूसेवन आणि शाळेच्या आवारात अनधिकृत व्यक्तींना थांबवण्याचे गंभीर आरोप झाले आहेत. या संदर्भात शिक्षण मंडळ सदस्य आणि युवक काँग्रेस, शिवाजीनगर मतदारसंघ अध्यक्ष अमित ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तसेच खडकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्याकडे तातडीने कारवाईची मागणी केली होती. दरम्यान महिला रखवालदाराचे निलंबन करण्यात आले आहे.
मुरकुटे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, महिला रखवालदार शाळेत अनेक वेळा दारू पिऊन बसणे, ड्युटीवर हजर नसणे, ड्रेस न घालणे यासह रात्रीच्या वेळेस आपल्या मुला-मुलींसह आणि त्यांच्या मित्रांसह शाळेच्या आवारात दारू प्यायचे प्रकार घडत आहेत. इतकेच नव्हे, तर शाळेत राहण्यासाठी दिलेल्या कोठीसमोर गांजाची रोपे लावण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. तक्रारीनंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली होती; मात्र पोलिस पोहोचण्यापूर्वीच आरोपीच्या मुलाने गांजाची रोपे उपटून मुळा-मुठा नदीत टाकल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे पालक वर्गामध्ये तीव्र नाराजी करण्यात आली. नागरिकांच्या वतीने ‘जन आक्रोश आंदोलन’ करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता.
झाडाचे व्हिडिओ व्हायरल..
शाळेच्या आवारातील गांजाच्या झाडाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. यामुळे शहरात खळबळ माजली होती.दरम्यान महिला रखवालदाराला निलंबीत करण्यात आले असून पोलिसांकडून पडताळणी सुरु असल्याची माहिती महापालिकेकडून मिळाली





