Pune Crime | ‘देखावे बघा पण गाडी सांभाळा’ ; शहरात वाहनचोरीचे प्रकार वाढले

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शहरातील देखावे साऱ्या राज्यातील नागरिकांच्या औत्सुक्याचा विषय असतो. यामुळे पुण्यात देखावे पाहण्यासाठी बाहेरून मोठ्या संख्येने नागरिक येतात. या गर्दीचा फायदा घेऊन पैसे, दागिने, दुचाकी लंपास करण्याच्या घटना या काळात वाढतात. मात्र, देखावे पाहण्यासाठी सहकुटुंब आलेल्या एकाची रिक्षा चोरून नेल्याची घटना शनिवारवाडा परिसरात घडली.
यामुळे देखावे पाहताना पैसे. दागिने, दुचाकी सांभळण्याबरोबर रिक्षासारखी मोठी वाहने कशी सांभाळायची असा प्रश्न पुढे आला आहे. रिक्षा चोरी प्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत रिक्षाचालकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रिक्षाचालक कुटुंबीयासोबत रविवारी (३१ ऑगस्ट) दुपारी देखावे पाहण्यासाठी आला होता.
त्याने शनिवारवाडा परिसरात रिक्षा लावली. चोरट्यांनी बनावट चावीचा वापर करुन रिक्षा चोरून नेली. देखावे पाहून रिक्षाचालक तेथे आला, तेव्हा रिक्षा जागेवर नसल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. चोरीला गेलेल्या रिक्षाची किंमत ७५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार कोकाटे तपास करत आहेत.
दुचाकीही लांबविली..
शनिवारवाडा परिसरात दुचाकी लावून देखावे पाहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाची दुचाकी चोरून नेल्याची घटनाही घडली आहे. याबाबत एकाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण वाकड परिसरात राहायला आहे. शनिवारी (३० ऑगस्ट) हा तरुण मित्रासाेबत देखावे पाहण्यासाठी आला होता. शनिवारवाडा परिसरातील सूर्या हाॅस्पिटजवळ त्याने दुचाकी लावली होती. दुचाकी चोरून चोरटे पसार झाले. पोलीस हवालदार मानमाेडे तपास करत आहेत.





