प्रभात वृत्तसेवा पुणे – पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना वाढत असून आता मार्केट यार्डमध्ये पोलीस हवालदाराला ट्रकचालक आणि साथीदारांनी मारहाण केली आहे. याप्रकरणी ट्रकचालकासह तिघांना अटक केली आहे.सुमीत सुभाष सरकटे ( ३४, रा. खराडी, नगर रस्ता), अक्षय नानासाहेब शिंदे ( ३०, रा. तळवडे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), मनजीत सुभाष कांबळे ( २८, रा. घोरपडी गाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार महेश सुभाष साळुंखे ( ३९, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. हवालदार साळुंखे हे बंडगार्डन पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. ते गुरुवारी (१७ ऑक्टोबर) रात्री साडेदहाच्या सुमारास कामावरून बिबवेवाडीतील घरी निघाले होते. मार्केट यार्डातील वखार महामंडळ चौक ते गंगाधाम चौक दरम्यान ट्रक भरधाव वेगात निघाला होता. गंभीर स्वरूपाचा अपघात घडण्याची शक्यता होती. हवालदार साळुंंखे यांनी ट्रकचालकाला मार्केट यार्डातील प्रवेशद्वार क्रमांक नऊजवळ अडविले. त्यावेळी जमलेल्या नागरिकांनी ट्रकचालकास मारहाण करण्याचा प्रयत्न केला. हवालदार साळुंखे यांनी जमावाला शांत केले. त्यानंतर ट्रकचालकाने साथीदारांना बोलावून घेतले. आरोपी अक्षय शिंदे आणि साथीदारांनी हवालदार साळुंखे यांना मारहाण केली. त्यांच्या डोक्यात हातातील कडे मारले. त्यानंतर आरोपी पसार झाले. साळुंखे यांनी तातडीने याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाल दिली. साळुंखे यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर त्यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पसार आरोपींना अटक केली असून, मार्केट यार्ड पोलीस तपास करत आहेत.