Pune Crime | अल्पवयीन मुली, महिलांवर अत्याचार करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा म्होरक्या अटकेत

प्रभात वृत्तसेवा
पुणे – अल्पवयीन मुली, महिला अपहरण, मारहाण व लैंगिक अत्याचार प्रकरणी अनेक दिवसांपासून पोलिसांना हव्या असलेल्या टोळी असलेल्या टोळीच्या म्होरक्यास अटक केली आहे. या आंतरराज्य टोळीच्या म्होरक्याचे नाव बेताब उर्फ शिवम उर्फ शुभम आनंद पवार ( ५०, रा. हनुमान टेकडी, कुसगाव, ता. मावळ) असे असून पुणे ग्रामीण पोलिसांनी कर्नाटकमधील कलबुर्गी येथे थरारक कारवाई करत अटक केली.
पवारच्या टोळीने लोणावळा परिसरात अल्पवयीन मुली, महिलांचे अपहरण केले होते. एका प्रकरणात पिडीतेवर लैंगिक अत्याचार करुन तिच्याकडील रोकड, मोबाइल हिसकावून घेतला होता. पोलिसांनी अल्पवयीन मुलगी, मुलाची सुटका केली असून त्यांना उपाशी ठेवून कामे करून घेतली जात होती, तसेच लोखंडी सळईने मारहाण केली होती.
पवारवर पुणे ग्रामीण जिल्ह्यात ४, गुजरातमध्ये २, कर्नाटकमध्ये १ गुन्हा दाखल आहे. अपहरण, जबरी चोरी, लैंगिक अत्याचार असे आरोप आहेत. तो यापूर्वी साबरमती कारागृहातून जामिनावर सुटून फरार झाला होता. माहिती मिळताच शाखेने कर्नाटक पोलिसांच्या मदतीने मालखेडमध्ये पवारला ताब्यात घेतले. त्याला लोणावळा पोलिसांच्या ताब्यात दिले असून न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, लोणावळा शहरचे निरीक्षक राजेश रामाघरे, पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.





