Pune Crime: पोलिसांवर हल्ला करणारा ‘तो’ सराईत गुन्हेगार जेरबंद; गुन्हे शाखेची थरारक कारवाई
Pune Crime: हवेली तालुक्यातील बोरीऐंदी येथील दरेकरवाडी रोडवर पोलिसांनी केली कारवाई; मुख्य आरोपी बिंतुसिंगविरुद्ध तब्बल २५ गंभीर गुन्हे दाखल.

Pune Crime: बाणेर पोलिसांच्या पथकावर हल्ला करून फरार झालेला सराईत गुन्हेगार बिंतुसिंग श्यामसिंग कल्याणी (वय ३०) याला गुन्हे शाखेच्या युनिट-५ आणि खंडणी विरोधी पथक-२च्या संयुक्त पथकाने थरारक पाठलाग करून जेरबंद केले. आरोपीच्या पलायनास मदत केल्याप्रकरणी हसपालसिंग नेपालसिंग कल्याणी (वय ३५) आणि निहालसिंग रामजसिंग कल्याणी यांनाही ताब्यात घेतले आहे. २१ जून रोजी बाणेर पोलिसांचे पथक घरफोडीच्या तपासासाठी आरोपींचा पाठलाग करत रामटेकडी, हडपसर येथे पोहोचले होते.
त्यावेळी बिंतुसिंगने पोलिसांच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केला, तर करणसिंगने धारदार शस्त्राने पोलिसांवर हल्ला केला. हल्ल्यात सहायक पोलीस निरीक्षक गणेश रायकर जखमी झाले. त्यानंतर स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात करणसिंग दुधाणी जखमी झाला. बिंतुसिंग तेथून फरार झाला. पोलीस हवालदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले आणि शशिकांत नाळे यांना माहिती मिळाली की, बिंतुसिंग हा बोरीऐंदी (ता. हवेली) गावाच्या शिवारात लपून बसला आहे.
पोलिसांनी दरेकरवाडी रोड, बोरीऐंदी येथे सापळा रचला. तेथे बिंतुसिंग हा हरपालसिंहसह उभा असल्याचे दिसताच पोलिसांनी त्याला पकडले. चौकशीत, हसपालसिंग कल्याणी आणि निहालसिंग रामजसिंग कल्याणी यांनी गुन्ह्याची माहिती असूनही बिंतुसिंगला पळून जाण्यास मदत केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दोघांनाही ताब्यात घेतले. बिंतुसिंग श्यामसिंग कल्याणी याच्याविरुद्ध २५ गुन्हे दाखल आहेत. हसपालसिंग कल्याणी याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद आहे.





