PCMC Action: पिंपळे गुरवमध्ये महापालिकेचा दणका! अनधिकृत बांधकामप्रकरणी ८ जणांवर गुन्हे दाखल
PCMC Action: महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत कारवाई; लक्ष्मीनगर, कृष्णराज कॉलनीसह विविध परिसरातील ५० ते १०० चौरस मीटरच्या बांधकामांवर महापालिकेचा हातोडा.

PCMC Action – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने पिंपळे गुरव परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम तीव्र केली असून, आठ बांधकामधारकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ३९७ अ (१) व ब अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील विविध भागांमध्ये परवानगीशिवाय उभारण्यात आलेल्या बांधकामांची पाहणी करण्यात आली.
यामध्ये लक्ष्मीनगर, कृष्णराज कॉलनी, तुळजाभवानी नगर, गुलमोहर कॉलनी, पंचरत्न नगर आणि गावठाण परिसरातील बांधकामांचा समावेश आहे. संबंधितांना यापूर्वी नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही नियमांचे पालन न झाल्याने गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली. कारवाई झालेल्या बांधकामांचे क्षेत्रफळ अंदाजे ५० ते १०० चौरस मीटर दरम्यान असून, विजय मानकर, अनिल जाधव व जे. एस. काझी, इरनक व प्रकाश कांबळे,
समीर दिवेकर व मारुती पलांडे, स्वप्नील बहिरट व प्रणव गायकवाड, जाधव व धुमकर, कैलास सूर्यकांत धनवटे तसेच बुरुड व सौरभ सुतार यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनाने नागरिकांना विनापरवाना बांधकामे न करण्याचे आवाहन केले असून, नियमबाह्य बांधकामांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे. शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी गुन्हे दाखल करण्याबरोबरच पुढील कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पिंपळे गुरवमधील ८ बांधकामधारकांवर गुन्हे
-५० ते १०० चौ.मी. क्षेत्रातील बांधकामांचा समावेश
-महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ३९७ अ (१) व ब अंतर्गत कारवाई
-अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेची मोहीम तीव्र





