Pune Crime: 40 हजार रुपये कर्जाने देवून उकळले साडेनऊ लाख

पुणे – वृद्ध महिलेने तिच्या नातीवर उपचारासाठी १० टक्के व्याज दराने घेतलेल्या ४० हजार रुपयांच्या बदल्यात बेकायदेशीरपणे सावकारी करणाऱ्याने साडेनऊ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पैसे उकळणारा व्यक्ती हा पुणे महानगरपालिकेच्या झाडू खात्यात नोकरीला आहे. ज्येष्ठ महिलेल्या मिळणाऱ्या निवृत्ती वेतनामधून आरोपीने हे पैसे उकळले आहेत.
दिलीप विजय वाघमारे (वय ५२, रा. गंज पेठ) असे या सावकारी करणाऱ्या पालिकेतील कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७० वर्षीय महिलेने पाच वर्षापूर्वी नातीच्या उपचाराकरिता वाघमारे याच्याकडून १० टक्के व्याज दराने ४० हजार रुपये घेतले होते. त्या बदल्यात महिलेने कर्ज काढून आरोपीस मुद्दल ४० हजार आणि व्याजापोटी एक लाख रुपये दिले होते. मात्र वाघमारे याने महिलेचा अशिक्षीतपणाचा गैरफायदा घेऊन आणखी व्याज आहे, असे महिलेला सांगितले. ते व्याज वसूल करण्यासाठी महिलेचे दोन एटीएम कार्ड व पासबुक वाघमारे याने काढून घेतले होते. त्या एटीएमवर दरमहा जमा होणारे १६ हजार ३४४ रुपये वाघमारे काढून घेत. तर महिलेला दरमहा १ ते २ हजार रुपये देत. गेल्या पाच वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. त्याने आठ लाख रुपये बेकायदेशीरपणे वसुल केले आहे. एवढ्यावरच न थांबता आणखी देणे असल्याचे सांगून वाघमारे याने एटीएम कार्ड व पासबुक देण्यास नकार दिला होता.
महिलेवर भीक मागण्याची वेळ –
वाघमारे पुरेसे पैसे देत नसल्याने महिलेवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे ती सारसबाग गणपती समोर फुटपाथवर भीक मागून जगत होती. गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या एका भाविकाने तिच्याकडे विचारपूस केली असता महिलेने सर्व हकिकत त्यांना सांगितली. त्यानंतर त्या व्यक्तीने खडक पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना भेटून महिलेची व्यथा सांगितली. त्यानंतर त्वरित वाघमारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





