Pune Crime | पुत्रप्राप्तीच्या नावाखाली फसवणूक ; महिलेकडून लाखोंची लूट,भोंदू बाबा गजाआड

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुत्रप्राप्तीची बतावणी करून महिलेकडून तीन लाख पंधरा हजार रुपये उकळणाऱ्या भोंदूला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. गिरीश बलभीम सुरवसे (३६, रा. शास्त्री चौक, आळंदी रस्ता, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या भोंदूचे नाव आहे.या प्रकरणी एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सुरवसेविरुद्ध महाराष्ट्र नरबळी जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्यातील विविध कलमांन्वये, तसेच अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार २६ वर्षीय महिला पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात राहायला आहे. दाेन वर्षे होऊनही पुत्रप्राप्ती होत नसल्याने ओळखीतील एकाने गिरीश सुरवसे याची माहिती दिली. सुरवसेला सिद्धी प्राप्त आहे. त्याच्याकडे गेल्यास पुत्रप्राप्ती होईल, असे तिला सांगण्यात आले. पुण्यात आल्यानंतर त्या सुरवसे याच्याकडे गेल्या. सुरवसेने त्यांना अंगारा दिला, तसेच लवकरच पुत्रप्राप्ती होईल, अशी बतावणी करून जाळ्यात ओढले. त्यानंतर सुरवसेने महिलेकडून वेळोवेळी पैसे उकळले, याकरिता महिलेने तिचे मंगळसूत्र विकून सुरवसेला पैसे दिले.
महिलेने पुत्रप्राप्तीसाठी मंगळसूत्र विकल्याची माहिती तिच्या पतीला मिळाली. सुरवसने फसवणूक केल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी सुरुवसेला अटक केली. आरोपी सुरवसेने अशा प्रकारे आणखी काही महिलांची फसवणूक केली का, त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे, अशी माहिती सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी दिली.





