Pune Crime : माजी उपसरपंच फडतरेला चार दिवस पोलीस कोठडी ; गुन्ह्यांची यादी दहावर

प्रभात वृत्तसेवा
शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील सराईत गुन्हेगार माजी उपसरपंच गणेश फडतरे व त्याच्या साथीदाराने कॅन्टीन चालकाचे अपहरण करीत खंडणी मागून जबरी चोरी केल्याने पोलिसांनी त्याला अटक करीत त्याची गावातून धिंड काढली. गुरूवार (दि.२५) रोजी शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.कोरेगाव भीमा येथील माजी उपसरपंच फडतरे व त्याच्या साथीदारांनी यापूर्वी अनेक ठिकाणी दहशत माजवत मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याच्यावर दहापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.
(दि.२४) रोजी फडतरे व विशाल शिवले या दोघांनी एका कॅन्टीन चालकाचे अपहरण करीत त्याला एक लाखाची खंडणी मागून मारहाण करीत त्याच्या जवळील सोन्याची चैन व रोकड काढून घेतली होती. याबाबत रोहन प्रकाश शिंदे (रा. वाघोली, ता. हवेली) यांनी शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दिली पोलिसांनी कोरेगाव भीमाचा माजी उपसरपंच गणेश भाऊसाहेब फडतरे (रा. कोरेगाव भीमा, ता. शिरुर), विशाल बाळासाहेब शिवले (रा. वढू बुद्रुक) यांच्यासह एक अनोळखी युवक यांच्या विरुद्ध खंडणी, अपहरण, मारहाण, जबरीचोरी प्रकरणी गुन्हे दाखल होताच पोलिसांनी गणेश फडतरे व विशाल शिवले या दोघांना तातडीने अटक केली.
त्यानंतर पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, हवलदार महेंद्र पाटील, श्रीमंत होनमाने, गणेश कुदळे, विकास पाटील, अमोल दांडगे, प्रतीक जगताप यांनी दोघांची त्यांच्याच गावातून हातात बेड्या घालून पायी चालवून धिंड काढत त्याची दहशत मोडीत काढली. यावेळी पोलिसांच्या कामगिरीचे शिरूर तालुक्यातून कौतुक होत आहे. पोलिसांनी अटकेतील दोघांना शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतिक जगताप हे करीत आहेत.
दहशत माजवणाऱ्यांची गय नाही..
शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोठे कोणीही दहशत वाजवण्याचे प्रकार करत असतील तर कोणाचीही गय करणार नसून यापुढे अशाच पद्धतीच्या कारवाया करणार असल्याचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी सांगितले.





