Pune Crime : प्रवाशांची पर्स-पाकिटे चोरणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश, ४ लाखांचा ऐवज जप्त

प्रभात वृत्तसेवा
पुणे – दिवाळीच्या काळात एसटी बसमधील वाढलेल्या गर्दीचा गैरफायदा घेत प्रवाशांचे पर्स आणि पाकिटे चोरणाऱ्या तीन महिलांना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने पकडले. वाकडेवाडी परिसरात केलेल्या या कारवाईत ४ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आशा देविदास लोंढे (वय ६०), रेखा मनोहर हतागंळे (वय ३५) आणि हेमा दिगंबर हतागंळे (वय ४१, सर्व रा. लोणी काळभोर, पुणे) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत.
या तिघींनी नाशिक-इस्लामपूर एसटी बसमधील गर्दीत एका महिलेचा मुद्देमाल चोरल्याची कबुली दिली. गुन्हे शाखा युनिट चारचे पथक हद्दीत गस्तीवर होते. त्यादरम्यान वाकडेवाडी बस स्थानक येथे संशयित महिला थांबल्याची माहिती पोलीस अंमलदार प्रवीण राजपूत, संजय आढारी यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून वाकडेवाडी बस स्टॉपवर छापा टाकला. पथकाने येथून तिघींना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून एक हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा ४ लाख १२ हजार २३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार, युनिट चारचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वैभव मगदुम, अंमलदार प्रवीण राजपूत, संजय आढारी, हरीश मोरे, विठ्ठल वाव्हळ, भरत गुंडवाड, मयूरी नलावडे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.





