Pune Crime – बालेवाडीतील बारमध्ये पोलिसांशी वाद घालून गोंधळ घालणाऱ्या तरुण-तरुणीवर बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या कामात अडथळा आणणे, शिवीगाळ करणे आणि महिला पोलिस अधिकाऱ्याच्या हाताला चावा घेऊन जखमी केल्याचा आरोप या दोघांवर आहे. मानसी चंपालाल परिहार ( २४, रा. पिंपळे सौदागर) आणि युवराज निलेश परतानी ( २४, रा. पाषाण ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून तीन मार्च रोजी रात्री पावणे बाराला बालेवाडीतील एजंट जॅक्स बारमध्ये ही घटना घडली. बारमध्ये भांडण झाल्याची माहिती मिळाल्यावर महिला पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया मांढरे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचल्या. यावेळी बारमध्ये एक तरुण, तरुणी मोठ्याने आरडाओरडा करत होते. त्यांनी बारमध्ये मारहाण झाल्याचा दावा करत सीसीटीव्ही फुटेज तात्काळ देण्याची मागणी केली. बार व्यवस्थापकाने फुटेजचे नियंत्रण मुंबईमध्ये असल्याने ते दुसऱ्या दिवशी देऊ असे सांगितले. यानंतर दोघेही संतप्त झाले आणि पोलिसांशी वाद घालू लागले. नंतर हे दोघे बाणेर पोलिस ठाण्यात आले आणि तेथेही गोंधळ घातला. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला असतानाही त्यांनी ऐकले नाही. दरम्यान दोघांच्या तोंडातून दारूचा वास येत असल्याचेही पोलिसांनी नमूद केले या दोघांनी पोलिसांना शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली. यावेळी मानसी परिहार हिने महिला पोलिस उपनिरीक्षकाच्या उजव्या हाताला चावा घेऊन जखमी केले. याशिवाय परिहारने मी आत्महत्या करून तुमच्या नावांचा उल्लेख करीन असे तर युवराज परतानी याने माझी पावर वापरून तुमच्या नोकऱ्या घालवतो अशी धमकी दिली