प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरात गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय गुन्हे सांख्यिकी संस्थेच्या (एनसीआरबी रिपोर्ट २०२३) अहवालावरून ही बाब उघडकीस आली आहे. या अहवालात २०२३ मध्ये घडलेल्या देशभरातील प्रमुख शहरांतील गंभीर गुन्ह्यांची संख्या, तुलनात्मक वाढ याबाबतचा आढावा घेण्यात आला आहे. २०२२च्या तुलनेत शहरात १६.४ टक्क्यांनी गुन्ह्यात वाढ झाली आहे.पुण्यात २०२१ मध्ये ९ हजार ५११ तर २०२२ मध्ये ११ हजार ७४ गुन्हे दाखल झाले. २०२३ मध्ये १२ हजार ५४२ गुन्हे दाखल झाले. यामध्ये महिला आणि अल्पवयीनांवर अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये २३ टक्क्यांहून अधिक वाढ तसेच अल्पवयीनांवर अत्याचारांचे गुन्हे ६८ टक्क्यांनी वाढले आहेत. पुणे पोलिसांकडून गंभीर गुन्ह्यांचा तपास केल्यानंतर न्यायालयात वेळेत आरोपपत्र दाखल करण्यात पुणे पोलीस दल हे देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोची, कोलकातानंतर पुणे पोलिसांकडून न्यायालयात वेळेत आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे एनसीआरबी २०२३च्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. “पोलीस पर्यायाने कायद्याची प्रभावी जरब राहिलेली नाही. समाजात कोणाला भीती राहिली नाही. या स्थितीत गुन्हे रोखण्यासाठी कडक कारवाई झाली पाहिजे. न्यायालयात दावे लवकर चालून आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. यामुळे कायद्याची जरब बसेल, गुन्हे करण्यास कोणी धजावणार नाही.” – अॅड. जितेंद्र सावंत, फौजदारी वकील “महिला अत्याचार, बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे वाढणे हे दुर्दैवी आहे. असे गुन्हे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केली पाहिजे. समाजात जनजागृती होणेही महत्त्वाचे आहे.” – अॅड. कमलेश गावडे, शिवाजीनगर न्यायालय येथे प्रॅक्टीस