Pune Crime : गुन्हे शाखेची धडक कारवाई ; १२ लाखांचा ड्रग्ससह नायजेरियन नागरिकास अटक

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मेफेड्रोन विकणाऱ्या नायजेरियन नागरिकाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून १२ लाख ४४ हजार रुपयांचे ६२ ग्रॅम मेफेड्रोन, दोन मोबाइल, दुचाकी असा १२ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.व्हेलेंटाइन ऊर्फ जेम्स अमुचे ईझेजा (३५, सध्या रा. येवलेवाडी, मूळ रा. नायजेरिया) असे आरोपीचे नाव आहे. अंमली पदार्थविरोधी पथकातील (एक) पोलीस कर्मचारी येवलेवाडीत गस्त घालत असताना व्हेलेंटाइन मेफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने कोंढवा भागात सापळा लावला. तो दुचाकीवरून तेथे येऊन कोणाची तरी वाट पाहात थांबला होता.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली, तेव्हा त्याचाकडे मेफेड्रोन सापडले.तो कोणाला मेफेड्रोन विक्री करणार होता, तसेच त्याने ते कोठून आणले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, उपनिरीक्षक दिंगबर कोकाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.





