Pune Crime | बुलेट शोरूममध्ये सिनेमा स्टाईल चोरी! बंदुकीचा धाक दाखवून सात लाखांची लूट

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सुरक्षा रक्षकाला शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी बुलेट विक्री दालनातील सात लाख रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना मुंबई- पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी भागात घडली.याबाबत सुरक्षारक्षक इंद्रसेन जाचक (वय ४५, रा. बावधन) यांनी खडकी पोलिसांत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकडेवाडी परिसरात ब्रह्मा मोटर्स बुलेट विक्रीचे दालन आहे.
जाचक तेथे सुरक्षारक्षक आहेत. मंगळवारी (दि. १९) पहाटे दोन चोरटे दालनात शिरले. त्यांनी जाचक यांना शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत दालनातील लॉकर उचकटून सात लाख ११ हजार रुपयांची रोकड लुटून नेली. घटनेची माहिती मिळताच खडकी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन दालनातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासले. पसार झालेल्या चाेरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करत आहेत.





