Pune Crime | घरफोडीचा आरोपी निघाला ‘सीरियल’ गुन्हेगार ; ५० हून अधिक गुन्ह्यांची कबुली

प्रभात वृत्तसेवा
पुणे – तब्बल ५० हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट दोन पथकाने नाशिक येथे सापळा रचून अटक केली आहे. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडीच्या तपासातून ही कारवाई झाली.कोरेगाव पार्क येथील पृथ्वी एक्सचेंज इंडिया लि. येथे तीन जुलै रोजी घरफोडी झाली होती. याच्या तपासात अंगुलीमुद्रा विभागाला आरोपीचे ठसे मिळाले. तपासात आरोपी रामनिवास मंजू गुप्ता ( ३७ वर्षे, रा. महू, मध्यप्रदेश / विठ्ठलवाडी, ठाणे) याचे नाव समोर आले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजूम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ आणि पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. यावेळी रसाळ यांना खबर मिळाली की आरोपी नाशिक येथे येणार आहे. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून आरोपी रामनिवास गुप्ता यास ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपीने कोरेगाव पार्क, येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, उप-आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखालील करण्यात आली.





