Pune Crime: सततच्या त्रासाला कंटाळून भावाकडून भावाचा खून; बिबवेवाडीतील घटना

पुणे – सतत मद्यपान करुन कुटूंबाला त्रास देत असलेल्या छोट्या भावाचा मोठ्या भावाने चाकूने वार करुन खून केला. ही घटना सोमवारी सकाळी अप्पर सुपर येथे घडली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी भावाला ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण उर्फ ऋतिक दत्तात्रय नवले ( रा. अप्पर सुपर, गणेश नगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचा खून केल्याप्रकरणी त्याचा मोठा भाऊ अनिकेत दत्तात्रेय नवले (२६) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, प्रवीण कोणताही कामधंदा करत नाही. तो सतत मद्यपान करुन घरामध्ये भांडणे करायचा. या भांडणाला अनिकेत आणि कुटूंब वैतागले होते. त्याने रविवारी रात्रीही भांडणे केली होती. यामुळे अनिकेतची पत्नी मुलीला घेऊन माहेरी गेली होती.
दरम्यान आज(सोमवारी) सकाळी पुन्हा दोघा भावांमध्ये वाद झाले. यावेळी घरात आई-वडिलही होते. रागाच्या भरात अनिकेतने प्रवीणच्या पोटात घरातील चाकूने सपासप वार केले. अनिकेत जागेवरच कोसळला. आई-वडिलांनी आरडा ओरडा केल्यानंतर शेजारच्याना घटना घडली. त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला खबर दिली.
पोलिस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा आरोपी अनिकेत घरातच डोक्याला हात लावून बसला होता. पोलिसांनी प्रवीणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर अनिकेतला ताब्यात घेण्यात आले. आरोपी अनिकेतचे वडिलही कोणताच कामधंदा करत नाहीत. त्याची आई धुण्याभाड्यांची तर तो स्वत: मजुरी काम करुन घर चालवतात. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.





