प्रभात वृत्तसेवा पुणे – एका खासगी बँकेतील रिकव्हरी एजंट ऑनलाईन मटका घेताना आढळला असून त्याचे नाव राहुल दिलीपसिंग परदेशी ( ४२, रा. धायरी, पुणे) असे आहे. परदेशीचे शिक्षण बी कॉम पर्यंत झाले आहे.खडक पोलिसांच्या पथकाने घोरपडी पेठ परिसरात मध्यरात्री छापा टाकून ऑनलाईन मटका घेणाऱ्यास पकडले. यावेळी मोबाईल फोन, रोकड व जुगाराचे साहित्य असा साडेतीन हजारांचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीत १७ मोबाईलवर ऑनलाईन बुकींग चालू असल्याचे आढळले. या १७ जणांवर खडक ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई आशिष चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.गस्त पथकातील आशिष चव्हाण, इरफान नदाफ यांना घोरपडी पेठेतील कै. निळु फुले जलतरण तलावाजवळ रस्त्यावर एकजण मोबाईलवर मटक्याचे आकडे घेत असल्याचे कळले. ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांना कळविल्यावर त्यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. दुचाकीवर बसून मटका घेणाऱ्यांची चौकशी केली असता १७ मोबाईलवर मटका बुकींग सुरू असल्याचे आढळले. मोबाईलमध्ये गुगल पे, फोन पे व पेटीएमसारखी मनी ट्रान्सफर अॅप असल्याचेही आढळले. चौकशीत परदेशीने कबुली दिली की तो मटक्याचे आकडे ग्राहकांकडून घेऊन मोबाईलवर नोंदवतो. त्यासाठी रोख तसेच ऑनलाईन पैसे स्वीकारतो. जुगाराचा पैसा ऑनलाईन फिरत असल्याने आर्थिक व्यवहारांचा तपास गुन्हे शाखा करणार आहे.