Pune Crime | बँकेला बनावट कागदपत्रांनी ५ कोटींचा गंडा ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रभात वृत्तसेवा
पुणे – बनावट कागदपत्रांद्वारे एका बँकेकडून पाच कोटींचे गृहकर्ज घेत फसवणूक केल्या प्रकरणी दोघांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.एका खासगी बँकेतील व्यवस्थापक अर्जुन अथोली (वय ३९, रा. साळुंके विहार सोसायटी, कोंढवा) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, महंमद युनुस शरीफ शेख आणि दरिउस सोलमन राफत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रविवार पेठेतील फडके हौद चौक परिसरात खासगी बँकेची शाखा आहे.
आरोपींनी जुलै २०२३ मध्ये गृह खरेदीसाठी कर्ज प्रकरण सादर केले. बनावट कागदपत्रांद्वारे त्यांनी बँकेकडून पाच काेटी २७ लाख रुपयांचे कर्ज मिळवले. कागदपत्रांच्या पडताळणीत हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर बँकेकडून तक्रार देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक श्वेता बेल्हेकर तपास करत आहेत.





