Pune Crime : सराईत चोरट्याकडून तब्बल २५ दुचाकी जप्त

पुणे – शहर परिसरात दुचाकी वाहने चोरणार्या सराईताला विश्रामबाग पोलिसांनी पुणे स्टेशन परिसरातून अटक केली. आरोपीकडून चोरीच्या तब्बल २५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी हा फिरस्ता असून त्याने पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरातील विविध ठिकाणी दुचाकी चोरीचे गुन्हे केले आहेत. पोलिसांना चकवा देण्यासाठी ओळख लपवून वावरणार्या या सराईताला विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने अटक केली.
संतोष शिवराम घारे (रा. ओझरडे, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शहर परिसरात दुचाकी वाहन चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. यातच शहराच्या मध्यवस्तीत वाहने चोरीच्या घटना सातत्याने घडतात. या पार्श्वभूमीवर विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक दिपाली भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर होते.
मध्यभागात दाट लोकवस्ती असल्याने ज्याठिकाणाहून वाहने चोरीला गेली आहेत, अशा सर्व ठिकाणांची माहिती काढून पोलिसांनी तांत्रिक तपास केला. सीसीटीव्हींची तपासणी करून आरोपीचा माग काढला. मिळालेल्या माहितीनूसार पोलिसांनी आरोपीचा आळंदी, देहू, चाकण भागत शोध घेतला. यादरम्यान संशयीत वाहनचोर हा पुणे स्टेशन भागात असल्याची माहिती उपनिरीक्षक मनोज बरूरे,संतोष मोरे, सहायक फौजदार राकेश गुजर, मयूर भोसले, अशिष खरात यांच्या पथकाला मिळाली.
त्यानूसार पथकाने सापळा रचून घारेला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने शहर परिसरात वाहनचोरी केल्याची कबूली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या तब्बल २५ दुचाकी जप्त करून विश्रामबाग, शिवाजीनगर, तळेगाव दाभाडे, भोसरी, सांगवी, हिंजवड या पोलीस ठाण्यातील २५ गुन्ह्यांची उकल केली. अप्पर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त संदीपसिंह गिल, वरिष्ठ निरीक्षक दिपाली भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज बोरूरे, राकेश गुजर, रेवण कंचे, अशोक माने, महावीर वलटे, राहुल मोरे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.




