Pune Crime : विनयभंग करून आरोपी पसार ; नांदेड सिटी पोलिसांत गुन्हा दाखल

प्रभात वृत्तसेवा
पुणे – जेवण केल्यानंतर रात्री फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या तरुणीशी अश्लील कृत्य करून पसार झाल्याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका तरुणीने नांदेड सिटी पोलिसांत फिर्याद दिली असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी शनिवारी रात्री जेवण करून घरातून बाहेर पडली.
सिंहगड रस्ता भागातील नांदेड सिटी परिसरातून ती असता रस्त्याकडेला बाकावर बसलेल्या आरोपीने तिचा पाठलाग करून अश्लील कृत्य केले. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी पसार झाला. नांदेड सिटी पोलिसांनी विनयभंग केल्याप्रकरणी पसार झालेल्या आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.
अश्लील कृत्य करणारा अटकेत..
शाळकरी मुलीला दुचाकीवरून चक्कर मारण्याचा बहाणा करून तिच्याशी अश्लील कृत्य करणाऱ्या एकाला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी श्रीराम आल्हाट (५०, रा. कळस, विश्रांतवाडी) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या १४ वर्षीय मुलीला आरोपी आल्हाटने दुचाकीवरून चक्कर मारण्याचा बहाण्याने नेऊन वाटेत मुलीशी अश्लील कृत्य केले. मुलीने याबाबतची माहिती आईला दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाडेकर तपास करत आहेत.





