Pune Crime: कॉलसेंटरमध्ये काम करणार्या तरूणीवर सहकाऱ्याचा चॉपरने हल्ला

Pune: कॉलसेंटरमध्ये काम करणार्या एका तरुणीवर तिच्याच सहकारी मित्राने चॉपरने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार येरवड्यातील डब्लूएनएस कंपनीच्या पार्किंगमध्ये घडला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून, कॉलसेंटरमध्ये काम करणार्या तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे समोर आले आहे.
शुभदा शंकर कोदारे (28,रा. बालाजीनगर कात्रज) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. चॉपरने वार करण्यात आल्याने मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. त्यामुळे तरुणीची शुद्ध हरपली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी, हल्लेखोर कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय.30,रा. खैरेवाडी शिवाजीनगर) याला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर रात्री उशीरापर्यंत खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तरुणी शुभदा ही मुळची सातारा येथील असल्याची माहिती आहे. सद्या ती कात्रज येथील बालाजीनगरमध्ये वास्तव्यस आहे. तर ती येरवडा येथील डब्लूएनएस या कॉलसेंटरमध्ये काम करते. हल्लेखोर तरुण कृष्णा हा तिचा मित्र असून, तो देखील त्याच कॉलसेंटरमध्ये काम करतो.





