प्रभात वृत्तसेवा वाघोली – केसनंद-वाघोली रस्त्यावरून पायी जाणार्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसका मारून चोरी करणार्या एका अल्पवयीन मुलाला गुन्हे शाखा युनिट 6 च्या पोलिसांनी निगडी (चिंचवड) परिसरातून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी सोन्याचे एक लाख रुपयांचे मंगळसूत्र व 50 हजार रुपयांची एक दुचाकी गाडी असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाघोली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने आजूबाजूच्या परीसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून तरुणाचे फोटो प्राप्त केले. त्याची ओळख निश्चित केल्याने तांत्रिक विश्लेषण करून पथक बीड येथे रवाना करण्यात आले; परंतु नमुद गुन्ह्यातील आरोपीत हा निगडी, पुणे येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली. अल्पवयीन मुलावर याअगोदर बीड जिल्ह्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तीन तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उस्मानपुरा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे.