Pune: सराईत गुन्हेगारांची झाडाझडती सुरू; ५१३ जणांची चौकशी

पुणे – मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. तीन दिवसांत पोलिसांनी शहर, उपनगरांतील एक हजार ५१३ सराईतांची चौकशी करून त्यांना समज दिली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचविल्यास कारवाई करण्यात येणार असून, पोलिसांनी सराईतांना तशा नोटिसाही बजावल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पाार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. नाकाबंदी, गुन्हेगारांचे वास्तव्याचे ठिकाणी (कोम्बिंग ऑपरेशन) अचानक तपासणी सुरू करण्यात आली. पुणे पोलिसांच्या परिमंडळ एक ते पाच मधील सराईतांना विविध पोलीस ठाण्यांत बोलावून त्यांची चौकशी करण्यात आली.
मागील तीन दिवसांत शहरातील एक हजार ५१३ सराईतांची चौकशी करण्यात आली आहे. त्यांना समज देण्यात आली असून, काहींना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्धही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
सराईत गु्न्हेगार, त्यांच्या वास्तवाच्या ठिकाणांवर करडी नजर ठेवण्यात आली असून, गुन्हे शाखा, तसेच पोलीस ठाण्यांमधील तपास पथकांकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. आचारसंहिता, तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) या कायद्यांचा भंग केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. प्रतिबंधात्मक आदेश, तसेच कायदा आणि सुुव्यस्थेला बाधा आणल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा, भारतीय न्याय संहिता १८९ (२), मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
रात्री अपरात्री फिरणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नाकाबंदी, तसेच कोम्बिंग ऑपरेशन करण्यात येत आहे. रात्री- अपरात्री उनाडक्या करत फिरणाऱ्या टवाळखोरांना पोलीस ठाण्यात नेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक शांततेचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
“नागरिकांनी कायदा आणि सुवस्थेचे पालन करणे गरजेचे आहे. आचारसंहितेचा भंग, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहचविणारे कृत्य करु नये.” – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त





