पुणे – कंटेनरच्या धडकेत कारमधीतील चौघे जण जखमी झाल्याची घटना पुणे-सातारा महामार्गावर देगाव फाटा परिसरात शनिवारी घडली. अपघातात साडेतीन वर्षांच्या बालिकेसह चौघेजण जखमी झाले. अपघातग्रस्त कंटेनर आणि कार क्रेनच्या सहायाने बाजूला काढल्यानंतर या भागातील वाहतूक सुरळीत झाली. सर्जेराव सखाराम पाटील ( ६०), बायक्का सर्जेराव पाटील ( ५०), प्रवीण सखाराम पाटील ( ३५), इरा प्रवीण पाटील ( साडेतीन, सर्व रा. दरेवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. अपघातात सर्जेराव पाटील, त्यांची पत्नी बायक्का हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नसरापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती राजगड पोलिसांनी दिली. पाटील कुटुंबीय मुंबईहून कारमधून कोल्हापूरला निघाले होते. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पुणे-सातारा महामार्गावर देगाव फाटा परिसरात चेलाडी उड्डाणपुलाजवळ पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने कारला धडक दिली. कंटेनरचालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाजवळ अडकला. अपघाताची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या चौघांना बाहेर काढले. त्यांना तातडीने नसरापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर वरवे ते देगाव फाटा परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. या भागात तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी क्रेन मागविली. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहायाने बाजूला काढल्यानंतर या भागातील वाहतूक सुरळीत झाली.