पुणे – मांजरीतील महादेव नगरमधील १६ वर्षीय मुलगी आणि एका तरुणाने खडकवासला धरणाजवळ विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. प्राथमिक तपासात दोघांत प्रेमसंबंध आणि त्याला मुलीच्या कुटुंबियांचा विरोध असल्याने ही घटना घडल्याचा अंदाज वानवडी पोलिसांनी वर्तविला आहे. गुरुवारी रात्री फिर्यादी अपूर्वा गुरसाळे (रा. महादेव नगर, मांजरी) यांनी वानवडी ठाण्यात आपली बहिण अक्षरा बेपत्ता असल्याची तक्रार दिले. त्याने बहिणीला फिजिक्सवाला क्लासेस, ९३ अव्हेन्यू चौक येथे सोडले होते. वर्ग संपल्यानंतर ती घरी परतली नाही. शोधाशोध करूनही ती सापडली नाही म्हणून रात्री दहाच्या सुमारास अपूर्वाने ठाण्यात तक्रार दाखल केली. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक लोंढे करीत होते. तक्रारीनुसार संतोष बाळासाहेब कळसाईत (रा. महादेव नगर, मांजरी; मूळ ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) याच्यावर संशय घेतला होता. तो आणि अक्षरा दोघे एकत्र असल्याच्या शक्यतेतून शोध सुरू झाला आज (शुक्रवार) सकाळपासून संशयितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, त्याचा मोबाईल बंद होता. त्याच्या मूळ गावी सरपंचाशी संपर्क साधला तेव्हा तो तेथे नसल्याची माहिती मिळाली. दरम्यान, उत्तम नगर पोलिसांना खडकवासला धरणाजवळ एका तरुण-तरुणीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यावर ते अक्षरा व संतोष असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार वानवडी पोलिसांना खबर देण्यात आली. अक्षरा अकरावीला असून तिची आई शिक्षिका तर वडिल एसटी चालक आहेत. तरुणाचे वडिल मोल मजुरी करत असून तो नोकरीच्या शोधात होता. दोघेही एकाच इमारतीत राहत असल्याने गेल्या दोन-तीन महिन्यांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. मुलीच्या घरच्यांना याची कल्पना होती आणि त्यांचा याला विरोध होता. यामुळेच तणावाखाली येऊन त्यांनी आत्महत्या केली असावी. – सत्यजित आदमाने. (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पोलीस ठाणे)