पुणे : नगरसेवक प्रमोद भानगिरे यांचे शक्तिप्रदर्शन

हडपसर –हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी शिवसेनेची ताकद वाढवली आहे. आता, पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी असेल तर आघाडी सोबत आणि आघाडी नसेल तर स्वबळावर याभागात स्वतःच्या विजयाबरोबर अन्य शिवसेनेचे सहकारी विजयी करू, असा विश्वास व्यक्त करणाऱ्या नगरसेवक नाना भानगिरे यांनी ज्येष्ठ उद्योजक बाळासाहेब तात्या भानगिरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
नमो विहार सोसायटी समोरील मैदानात शुक्रवारी सायंकाळी नगरसेवक नाना भानगिरे व समर्थकांनी बाळासाहेब तात्या भानगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. भानगिरे परिवाराकडून या ठिकाणी “गोड-तिखट’ भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. उद्योजक बाळासाहेब भानगिरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त असले तरी नगरसेवक नाना भानगिरे यांनी आपले समर्थक व हितचिंतकांना एकत्र करीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.विशेष म्हणजे समर्थक, शिवसैनिक, पदाधिकारी यांच्या बरोबर किंबहुना त्याहून अधिक नवीन प्रभाग क्र. 44 व 46 मधील सर्वसामान्य नागरिक यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, नवीन प्रभाग क्र. 46 महंमदवाडी-उरुळी देवाची मधून नगरसेवक नाना भानगिरे शिवसेनेकडून स्वतः उभे राहणार आहेत. तर या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने प्रभाग क्र. 44 काळेपडळ-ससाणेनगर येथून पत्नी कांचन प्रमोद भानगिरे तसेच नितीन गावडे व अभिमन्यू भानगिरे यांनाही उमेदवारीसाठी पुढे आणल्याचे दिसत आहे.
महाविकास आघाडीतील नेते उपस्थित…
हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास महाविकास आघाडीतील अनेक मान्यवर नेत्यांनी हजेरी लावली. शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार चेतन तुपे पाटील यांच्यासह अन्य नेत्यांची उपस्थिती या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.
कार्यकर्त्यांची मोठी फौज…
उद्योजक बाळासाहेब भानगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक नाना भानगिरे यांनी आयोजित केलेल्या या स्नेहमेळाव्यास संपूर्ण हडपसर मतदार संघातील शिवसेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाना भानगिरे यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनीही या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती. यातून भानगिरे यांच्या कार्यकर्त्यांची फौज दिसून आल्याची चर्चा होती.





