Pune : सुरक्षा रक्षक निविदांबाबत ठेकेदारांना उपरती?

पुणे – महापालिकेच्या मिळकतींसाठी सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी काढलेली निविदा कामाची मुदत, तसेच नियम व अटींवरून वादग्रस्त ठरलेली असतानाच या निविदा १६ ते १८ टक्के अधिक दराने भरलेल्या ठेकेदारांनी हेच काम आता चक्क २ टक्के दराने करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे या निविदा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. सर्वात कमी दर असलेल्या ठेकेदाराने २ टक्के दराने काम करण्याची तयारी दर्शविल्यानंतर उर्वरीत दोन ठेकेदारांनीही त्याच दराने काम करण्यास तयारी दाखविली आहे.
महापालिकेच्या एस्टिमेट कमिटीने केलेल्या शिफारशीनुसार प्रशासनाने तीन वर्षांसाठीची १३९ कोटी ९२ लाख रुपयांची निविदा काढली. या निविदांच्या अटीशर्तीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर या निविदांसाठी पात्र असलेल्या तीनमधील एका ठेकेदाराची १६.५० टक्के दराची सर्वात कमी दराची निविदा होती. उर्वरीत दोन ठेकेदारांनी १७.३० आणि १८ टक्के दराने निविदा भरली होती.
त्याच वेळी मागील वर्षी आलेली निविदा अवघी दीड टक्के दराने अधिक होती. त्यामुळे ही निविदा रद्द करणे अपेक्षित असताना प्रशासनाने या ठेकेदाराशी वाटाघाटी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्वात कमी दर आलेल्या ठेकेदाराने आधी १० टक्के दराने व नंतर ६ टक्के दराने काम करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर स्वत: आयुक्त या वाटाघाटीत उतरल्यानंतर ठेकेदाराला उपरती आली असून, अवघ्या २ टक्के दराने काम करण्यास तयारी दर्शविली आहे. उर्वरीत दोन ठेकेदारांनीही त्याच दराने काम करण्याची तयारी दर्शविली असल्याने तीन ठेकेदारांना हे काम विभागून देण्यात येणार आहे.
शहाणपणा की आणखी काही?
ठेकेदारांकडून दर कमी करण्याबाबत प्रशासनाकडे खुलासा करताना आपण या सुरक्षा रक्षकांना वेतनासोबतच बोनस, घरभाडे, ग्रॅच्युटी आणि सुट्टीचे वेतन देणार होतो. त्यामुळे जादा दाराने निविदा भरल्याचा खुलासा केला आहे. मात्र, प्रत्यक्षात महापालिकेच्या निविदेत हा खर्च देण्याबाबत कोणतीही अट अथवा नियम नव्हता. असे असताना परस्पर हा खर्च का वाढवला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यातील काही ठेकेदारांवर वेतन वेळेवर न देणे, इतर सेवांचा लाभा कामगारांना न देणे असे ठपके ठेवत पालिकेनेच कारवाई केली आहे. त्यामुळे अटी शर्थीच्या बाहेर जात निविदांचा खर्च वाढविणे शहाणपणा होता की आणखी काही, असा सवाल उपस्थित होत आहे.





