Pune : कंत्राटी कामगारांचा अधिकाऱ्यांसमोर ठिय्या

पुणे – पुणे महापालिकेमधील ईगल आणि सिंग सिक्युरिटी या दोन कंपन्यांतून कार्यरत असलेल्या कंत्राटी सुरक्षारक्षकांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळालेले नव्हते. त्यामुळे राष्ट्रीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. त्यानंतर महापालिकेने ठेकेदारांवर दबाव आणत मे महिन्याचे वेतन जमा करण्यास सुरुवात केली.
राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, सरचिटणीस एस. के. पळसे, तसेच सुरक्षारक्षकांचे प्रतिनिधी विजय पांडव, उज्ज्वल साने, गुरुनाथ बिराजदार, अरविंद आगम, जानवी दिघे, सचिन घोरपडे, प्रकाश इंदोरीकर, दिपाली कांबळे आंदोलनात सहभागी झाले होते.
आंदोलनानंतर प्रतिनिधी मंडळाने अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. व ओमप्रकाश दिवटे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. दोन्ही अतिरिक्त आयुक्तांनी लवकरच आयुक्तांसमवेत बैठक घेऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
यानंतर कामगार अधिकारी नितीन केंजळे यांच्या दालनात शिंदे व कर्मचाऱ्यांनी ठिया आंदोलन सुरू करत वेतन मिळेपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर केंजळे यांनी ईगल कंपनीशी संपर्क साधत मे महिन्याचे थकीत वेतन तत्काळ जमा करण्याचे निर्देश दिले.





