Pune : हांडेवाडी व मंतरवाडी चौकात कोंडी

फुरसुंगी – मंतरवाडी-कोंढवा बाह्यवळण मार्गावरील हांडेवाडी चौक व मंतरवाडी चौकातील ट्रॅफिक सिग्नल अनेक वर्षांपूर्वी बसवण्यात आले. परंतु, हे सिग्नल आजपर्यंत सुरु करण्यात आलेले नाहीत. सिग्नल बंद असल्याने चौकांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच वाहतूक पोलिसांची संख्याही कमी असल्याने चौगातील हे सिग्नल फक्त शाभेसाठी बसविण्यात आले आहेत का? असा प्रश्न नागररिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मंतरवाडी-कोंढवा बाह्यवळण मार्गावरुन सासवड, हडपसर, सातारा, मुंबई हायवे, सोलापूर महामार्गाकडे जाणाऱ्या हजारो अवजड वाहनांची वर्दळ अहोरात्र सुरु असल्याने या रस्त्यांवर २४ तास गर्दी असते. या मार्गाच्या बाजूलाच शाळा, महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांची देखील मोठी वर्दळ असते.
महामार्गावर रस्त्यातच रिक्षा, चारचाकी व अवजड वाहने थांबत असल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. चौकाच्या रस्त्यावर दोन्ही बाजूने अतिक्रमण व वाहने उभी केली जात असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
मुख्य रस्त्यात अवजड वाहने उभी राहून रस्ता अडवतात तर कधी दुचाकी रस्त्यावर येतात. येथे वाहतूक नियंत्रक दिवेही सुरु नाहीत आणि वाहतूक पोलीसही नसतात, त्यामुळे या चौकांतून वाहने बेदरकारपणे ये-जा करत असल्याने या चौकात नेहमीच वाहनांची कोंडी झालेली असते. या ठिकाणी असलेले वाहतूक नियंत्रण दिवे सुरू करण्यात यावेत, अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.





