Pune | व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयांची लपवाछपवी

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या दोन अधिसभांच्या बैठकीत व्यवस्थापन परिषदेचे सर्व ठराव व निर्णय विद्यापीठाच्या संकेस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. विद्यापीठ हे सार्वजनिक आहे.
येथील सर्व निर्णय संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. परंतु त्याकडे प्रशासनाकडून कानाडोळा केला जात आहे. “विद्यार्थी केंद्रित असलेल्या आणि विद्यार्थ्यांच्या शुल्कातून चालणारे विद्यापीठ सर्व ठराव कधी संकेतस्थळावर प्रसिद्ध कधी करणार आहे?’ असा संतप्त सवाल अधिसभेच्या सदस्यांकडून उपस्थित होत आहे.
पुणे विद्यापीठ अधिसभेची बैठक शनिवारी आहे. यात सदस्य डाॅ. हर्ष गायकवाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला आहे. व्यवस्थापन परिषद ही विद्यापीठाचे निर्णय घेणारी महत्त्चाचे अधिकार मंडळ आहे. या परिषदेचे सर्व ठराव विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबतचा ठराव यापूर्वीच्या अधिसभेत मंजूर करण्यात आला आहे. मात्र, आजपर्यंत असे ठराव संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले नाहीत, याकडे गायकवाड यांनी लक्ष वेधले आहेत.
अन्य विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेचे ठराव संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातात. पण पुणे विद्यापीठाला काय अडचण आहे? सदस्यांनी मांडलेल्या ठरावास काहीच अर्थ नाही का’ असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
दरम्यान, या प्रश्नास डाॅ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी उत्तर दिले आहे. विद्यार्थी हिताचे ठराव संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबतचा निर्णय झाला आहे. हे ठराव संकेतस्थळावर उपलब्ध होतील, असे उत्तर डाॅ. एकबोटे यांनी दिले आहे. मात्र अन्य ठराव विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध का होत नाहीत, याचे समर्पक उत्तर मिळाले नसल्याचे अधिसभा सदस्य गायकवाड यांचे म्हणणे आहे.
एकतर विद्यार्थी हिताचे ठराव संकेतस्थळावर दिसतच नाहीत. याउलट अन्य ठराव प्रसिद्ध न करणे म्हणजे सर्व संशयास्पद कारभार आहे, असा आरोप गायकवाड यांनी विद्यपीठ प्रशासनावर केले आहे.
प्रशासनास धारेवर धरणार
विद्यापीठात पूर्णवेळ प्राध्यापकांची रखडलेली भरती प्रक्रिया, रिक्त अधिष्ठाता व कुलसचिव यांची पदे, एनआयआरएफ रँकिंगमध्ये विद्यापीठाची घसरण, मराठी भाषा विषयाकडे दुर्लक्ष, उपकेंद्राचे रखडलेले उद्घाटन आदी विषय अधिसभेत गाजणार आहेत. यासह स्थगत प्रस्ताव मांडून विद्यापीठ प्रशासनास धारेवर धरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.





