पुणे –महापालिका सदस्यांची मुदत संपल्यानंतर पालिकेत कार्यरत असलेल्या स्थायी समिती, विधी समिती, महिला आणि बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती, नाव समिती, क्रीडा समिती, शिक्षण समिती बरखास्त झालेल्या आहेत. मात्र, या समितीच्या माध्यमातून होणारे कामकाज नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी पूर्वी प्रमाणेच या समित्यांकडे प्रचलित कार्यपद्धती प्रमाण प्रस्ताव (विषयपत्र) नगरसचिवांच्या माध्यमातून पाठविण्यात यावेत, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.
महापालिकेची मुदत दि. 14 मार्चला संपली आहे. यावर पालिका प्रशासनाने अखेर तोडगा काढला असून विकासकामांचे येणारे प्रस्ताव समित्या अस्तित्वात असल्या प्रमाणेच प्रचलित पद्धतीनुसार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे प्रस्ताव खाते प्रमुखांच्या माध्यमातून हे प्रस्ताव नगरसचिव विभागाकडे येतील नंतर नगरविकास विभागाकडून संबंधित समित्यांचे कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे जातील. त्यानंतर त्याची कार्यपत्रिका तयार होणार आहे.
सोमवारपासून अंमलबजावणी…
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार या कामकाजाची अंमलबजावणी सोमवार पासून (दि.21) होणार आहे. आयुक्तांनी याबाबतचे आदेश गुरूवारी काढले असले तरी शुक्रवारी धुलीवंदन तसेच शनिवार, रविवारची सुट्टी असल्याने सोमवारपासून या अंमलबजावणी होणार आहे.