Pune: फ्लेक्सबाजीवर आयुक्तांचा संताप

पुणे – शहराच्या अनेक प्रमुख चौकांमध्ये जाहिरातींचे अनधिकृत फ्लेक्स लावले जात आहेत. यातून होणाऱ्या विद्रुपीकरणावर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी संताप व्यक्त करीत बुधवार (दि.२१) पूर्वी असे अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड काढण्याबाबतचे आदेश सर्व आकाशचिन्ह निरिक्षक तसेच सहायक महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
आयुक्त स्वत: शहरात फिरणार पाहणी करणार असून ज्या भागात असे जाहिरातीचे फ्लेक्स आढळतील त्या निरिक्षकांवर थेट कारवाई केली जाणार आहे. मागील आठवड्यात आॅनलाइन बैठक घेत याबाबत सूचना केल्या आहेत, असे अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमणार यांनी सांगितले.
विद्रुपीकरणावर आयुक्त नाराज…
मागील आठवड्यात शनिवार, रविवार यासह मंगळवार तसेच बुधवारीही पालिका आयुक्तांनी शहरात दाैऱ्यावेळी अनेक चौकांमध्ये तसेच दुभाजकांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत जाहिरातबाजी केल्याचे पाहिल्यानंतर संबंधित क्षेत्रीय कार्यालय अधिकार्यांना याबाबत कारवाईचे आदेश दिले, तसेच आॅनलाईन बैठक घेत या विद्रूपीकरणावरून अधिकार्यांना फैलावर घेतले. पुढील बुधवारी स्वत: पाहणी करणार असल्याचे सांगत संबंधित अधिकार्यांवर कारवाईचा इशाराही दिला.
राजकीय फलकांचा बाजार…
शहरात प्रामुख्याने राजकीय फलकांचा बाजार भरल्याचे दिसते, अशा फलकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात परवानगी घेऊन कार्यक्रम झाल्यानंतर ते काढणे अपेक्षित असताना राजकीय चढाओढीतून वाढदिवसांचे फलक, राजकीय कार्यक्रमांचे फलक लावले जातात, अशा फलकांवर कारवाईसाठी गेल्यानंतर अधिकार्यांना धमकावले जात आहे, अनधिकृत जाहिरात लावणार्यांवर कारवाई करण्याऐवजी त्या काढण्यावर पालिकेकडून पुणेकरांचा पैसा खर्च केला जात आहे.
“अनधिकृत जाहिरात फलकांबाबत आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे, त्यानुसार, सर्वांना तातडीने शहरात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून येत्या बुधवारी स्वत: आयुक्त शहरात पाहणी करणार आहेत.” – डाॅ. कुणाल खेमणार, अतिरिक्त महापालिका, आयुक्त





