Pune : टोईंगवर आयुक्तांची बंदी; वाहनधारकांच्या तक्रारींची दखल

संजय कडू
पुणे– नो पार्किंगमधील वाहने उचलणाऱ्या टोईंगबाबतच्या विविध तक्रारींची दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गेल्या महिन्यापासून सर्व टोईंग व्हॅन आणि टेम्पोंच्या कारवाया थांबवल्या आहेत. तसेच ठेकेदाराला सर्व कंत्राटी कर्मचारी तातडीने बदलण्याचे आदेश दिले असून वाहतूक विभागातील वादग्रस्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही उचलबांगडी करण्यात येणार आहे.
वाहनधारकांकडून बेकायदा शुल्क वसूल करणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांची अरेरावी, कायदा हातात घेऊन वाहनधारकांना त्रास देणे यासंदर्भात सामान्य नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी कठोर पावले उचलली आहेत.
थेट खिशात पैसे
वाहनचालकांकडून बेकायदेशीरपणे रोख रक्कम घेऊन त्यांना सोडून दिल्याच्या अनेक तक्रारी केल्या होत्या. विशेष म्हणजे, ही कारवाई करताना कायदेशीर चलने फाडली जात नव्हती. यामुळे सरकारचा महसूल बुडत होता. या प्रक्रियेत अधिकारी, कर्मचारीही थेट सहभागी होते. शहरातील २० वाहतूक विभागांपैकी बहुतांश ठिकाणी ही प्रथा खुलेआम सुरू होती. त्यातच कंत्राटी कर्मचारी महिला, वाहनधारक. ज्येष्ठ नागरिकांशी अरेरावीने वागत होते.
सीसीटीव्हीचा फसवा प्रयोग
अनेक तक्रारी आल्यानंतर २०१८ मध्ये टोईंग गाड्यांवर सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. या कॅमेऱ्यांचे कनेक्शन थेट वाहनाच्या बॅटरीशी जोडलेले असल्यामुळे, गाडी बंद झाल्यावर सीसीटीव्हीही बंद होत असे. यामुळे गाडी बंद ठेऊन अनेक बेकायदेशीर प्रकार पार पाडले जात होते. आता टोईंग वाहनांवर स्वतंत्र बॅटरीवर चालणारे सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश दिले आहेत..
‘गेल्या महिन्यापासून टोईंगची कारवाई पुर्ण बंद केली आहे. ठेकेदाराला सर्व कर्मचारी बदलण्याचे आदेश दिले आहेत. तक्रारी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची वाहतूक शाखेतून बदली करण्यात येणार आहे.’ -अमितेश कुमार, पोलीस आयुक्त
२० टेम्पो, १० क्रेन, १२५ कर्मचारी
शहरात वीस वाहतूक विभागात २० टेम्पो आणि १० क्रेन आहेत. यावर ठेकेदाराचे १२५ कंत्राटी कर्मचारी आहेत. महिन्यापासून टोईंग बंद असल्याने सुमारे ५४ लाखांचा महसूल बुडाला आहे.





