आयुक्त नवल किशोर राम पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे अखेर पडघम वाजले असून, निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या घोषणेपूर्वी पुणे महापालिका हद्दीत आदर्श आचारसंहिता लागू होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, पुणे महापालिकेसाठी आचारसंहिता लागू होणार नसल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापालिकेची नियमित कामे, विकास प्रकल्प आणि प्रशासकीय निर्णय पूर्ववत सुरू राहतील. निवडणूक आयोगाकडून आज झालेल्या पत्रकार परिषदेत नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मात्र, राज्यातील महापालिका निवडणुकांविषयी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुणे महापालिका क्षेत्रासाठी आचारसंहिता लागू होणार नाही, हे निश्चित झाले आहे. या संदर्भात आयुक्त नवल किशोर राम यांनी राज्य सचिवांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून स्पष्टता मिळवली. त्यांनी सांगितले की, पुणे महापालिका हद्दीसाठी निवडणुकीची अधिसूचना अद्याप राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाही. त्यामुळे प्रशासन आणि विकासात्मक कामे पूर्ववत सुरू राहतील. महानगरपालिका निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतरच आचारसंहिता लागू होईल. राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर शहरात आचारसंहितेबाबत चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आयुक्तांच्या या स्पष्टीकरणामुळे नागरिक आणि प्रशासकीय विभागांना मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिकेच्या विविध विभागांना नियोजित कामे वेळेत पूर्ण करण्यास तसेच नव्या प्रकल्पांच्या मंजुरीसाठी कोणताही अडथळा येणार नाही. राजकीय कार्यक्रमांना मर्यादा महापालिकेला विकासकामांसाठी मर्यादा येणार नसल्या तरी महापालिकेच्या हद्दीलगत असलेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगी या नव्याने स्थापन झालेल्या नगर परिषदेची निवडणूक होणार आहे. ही दोन्ही महापालिकेच्या हद्दीतूनच वगळण्यात आली असल्याने ती पालिकेच्या हद्दीजवळच आहे. त्यामुळे, महापालिकेस या गावांच्या आचारसंहितेवर परिणाम होईल अशी कोणतीही घोषणा अथवा उद्घाटनाचा राजकीय कार्यक्रम घेता येणार नसल्याने निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्येच ही हद्दीची बाब स्पष्ट करण्यात आली आहे.