Pune: सणासुदीत नारळाला विक्रमी भाव

प्रभात वृत्तसेवा
पुणे – अनियमित हवामानामुळे नारळाचे उत्पादन जवळपास २५ टक्के घटले आहे. त्यामुळे नारळाच्या भावात सतत वाढ होत असून महिनाभरात घाऊक बाजारात नगा मागे दर्जा आणि प्रकारानुसार ५ ते ७ रुपयांनी वाढ झाली आहे. दर्जानुसार एका नारळास ४० ते ५० रुपये मोजावे लागत आहेत. नारळाला मिळालेला हा विक्रमी भाव आहे.
मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज दोन ते अडीच लाख नारळांची आवक सध्या होत आहे. एका पोत्यात १०० नारळ असतात. ही आवक नेहमीच्या तुलनेत कमी आहे. दक्षिणेची कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू ही मुख्य नारळ उत्पादक राज्ये आहेत. पावसाचे कमी प्रमाण, घटलेले पीक आणि नारळाला मोठ्याप्रमाणात लागलेली कीड यामुळे नारळाचा पुरवठा कमी आहे. त्याचा थेट परिणाम दरांवर झाला आहे. आगामी काळात गणेशोत्सव, नवरात्र आदी सण असून यावेळी नारळांना मोठी मागणी असते.
सणांमध्ये मंदिरात तोरण वाहण्याची प्रथा आहे. उपवासाचे खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी नारळाची गरज असते. त्यातच खोबरेल तेल, गोटा खोबर्याला मागणी असते. मार्केटयार्डातून पुणे शहर, उपनगर आणि जिल्ह्यातील ग्राहक नारळाची खरेदी करतात. धार्मिक वापराबरोबरच हाॅटेल, केटरिंग व्यावसायिक तसेच खाद्यपदार्थ विक्रेते मोठ्या प्रमाणात नारळ खरेदी करतात.
“सण, उत्सवाचा काळ असल्याने नारळाला चांगली मागणी आहे. मागणीच्या तुलनेत आवकही कमी असल्याने भाव विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. लवकर भाव कमी होण्याची शक्यता नाही.” – दिपक बोरा, नारळाचे व्यापारी, मार्केटयार्ड.
घाऊक बाजारातील शेकडा नारळाचे दर्जानुसार भाव (रुपयांमध्ये)
नारळाचा प्रकार २६ जून २६ जुलै
- नवा नारळ २००० ते २२०० २६०० ते २७००
- साऊथ नारळ २१०० ते २२०० २८०० ते २९००
- मद्रास ४२०० ते ४७०० ४७०० ते ५२००
- पालकोल २४०० ते २५०० २७५० ते २८५०
- सापसोल मोठा ४२०० ते ५२०० ४५०० ते ५६००
- सापसोल मध्यम २१०० ते ३००० २५०० ते ३५००





