Pune : शहरात ढगाळ वातावरण; काही भागांत पावसाची भुरभूर

पुणे – शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात चार ते पाच अंश सेल्सियसने तापमानवाढ झाली आणि हुडहुडी भरणारी थंडी गायब झाली. गेल्या २४ तासांत ढगाळ वातावरणामुळे शहरात उकाडा वाढला आहे. मंगळवारी सायंकाळी शहराच्या काही भागांत पावसाची हलकी सर तर काही भागात भुरभुर झाली.
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शहरातील किमान तापमान ८ अंशापर्यंत खाली आले. त्यामुळे एनडीए, हवेली, पाषाण, कोथरूड, शिवाजीनगर, औंध यासह जिल्ह्यातील नारायणगाव, बारामती, राजगुरूनगर यासह अन्य भागात हुडहुडी भरणारी थंडी होती. काही ठिकाणी थंडीची लाट आली. मात्र, बदलत्या हवामानामुळे गेल्या ४८ तासांत ८ ते १० अंशांवर असलेले किमान तापमान आज १४ ते १६ अंशावर पोहचले.
तर दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे उकाडाही वाढला आहे. मंगळवारी सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते. धुक्याचे प्रमाणही कमी झाले. किमान तापमान १९ अंशांपुढे गेल्यामुळे दिवसभर उकाडा जाणवत होता. तर पुढील दोन दिवस शहरातील हवामान सकाळी कोरडे तर दुपारनंतर ढगाळ वातावरण असेल. पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.





