Pune : शहरातील हवेची गुणवत्ता “उत्तम”; प्रदूषकांमध्ये लक्षणीय घट

पुणे- अलीकडील काळात शहरातील हवेतील प्रदूषकांमध्ये लक्षणीय घट झाल्याने पुणेकर सध्या “शुद्ध’ हवेत श्वास घेत असल्याचे पहायला मिळत आहे. हवा प्रदूषणाबाबत घेण्यात आलेल्या नोंदीनुसार शहरातील हवेची गुणवत्ता ही सध्या “उत्तम’ स्तरावर आहे.
सर्वसामान्यपणे देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत टॉप टेनमध्ये असणाऱ्या पुण्यातील हवा सध्या उत्तम स्थितीत असल्याचे सफर-आयआयटीएम या संस्थेच्या नोंदीमधून समोर आले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार, हवेतील प्रदूषकांची प्रमाण मर्यादा ही 80 क्युबिक घनमीटर इतकी असते. मात्र, अनेकदा हवेतील प्रदूषणाची पातळी ही मार्यादेपेक्षा अधिक म्हणजे 100 हून अधिक होऊन प्रदूषणाचा तीन अंकी आकडा गाठत असते. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला मर्यादित लॉकडाऊन, पाऊस यामुळे हवेच्या प्रदूषणात लक्षणीय घट झाल्याचे पहायला मिळत आहे.
पावसामुळे दिलासा
शहरात जूनपासून लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर नागरिक घराबाहेर पडण्याचे प्रमाण बऱ्यापैकी वाढले. साहजिकपणे वाहनांची वर्दळ वाढल्याने हवेतील प्रदूषकांचे प्रमाणही काहीकाळ वाढले होते. मात्र, जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाचे प्रमाण वाढल्याने हवेतील प्रदूषके पावसाच्या पाण्यात विरघळली. त्यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता ही उत्तम अशी नोंदली गेली.





